Monday, November 25, 2013

आणि मी कवी झालो!

खरं तर कविता वगैरे करणं हा काही माझा प्रांत नाही. एकंदरीत मी कवितेपासून (आणि कवींपासूनही!) चार हात दूरच असतो. पूर्वी भा. रा. तांबे, बालकवी, कुसुमाग्रज, सुरेश भट यांच्या कविता आवडीने वाचायचो. पण त्यानंतर मात्र कवितेचा आणि माझा संबंध पार म्हणजे पारच तुटला.

पण अलीकडे काही दिवस मनाची एक विचित्र प्रकारची घुसमट होत होती. सांगता येत नाहीय, पण खूप एकटेपणा वाटू लागला होता. तसं पहिलं तर आयुष्य खूप छान चाललंय. पण तरीही काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. आणि मग एकदम डोक्यात प्रकाश पडला.

मी जीव ओतून काम करत होतो. घरासाठी पुरेसा वेळ देत होतो. पण स्वतःसाठी कुठे काय करत होतो! त्यातूनच स्वतःला व्यक्त करायची जाणीव झाली. आणि अचानक कविता सुचली (पाझरली, स्रवली, प्रसवली, स्फुरली… काहीही म्हणा!).

एक शोध लागला. गद्यापेक्षा पद्यातून स्वतःला व्यक्त करणं सोपं असतं, विशेषतः आपण अस्वस्थ असतो तेव्हा! त्यातूनच मी कविता केली आणि मी कवी झालो!

आता मात्र बास झालं! कविता पुरे आणि त्यामागची अस्वस्थताही पुरे. अजून इतर बऱ्याच प्रांतात मुशाफिरी करायची आहे. तेंव्हा भेटू पुन्हा, जगाच्या पाठीवर, दुसऱ्या कुठल्यातरी स्वरुपात. कवितेव्यतिरिक्त!

Sunday, November 24, 2013

बळ

घाबरत नाही मी माझा दुबळेपणा सांगायला
हेच माझे बळ आहे सांगून ठेवतो तुम्हाला! :-)

दुनियादारी

दुनियादारी दुनियादारी हीच आमची रीत रे
चेहऱ्यावरच्या मुखवट्यावर लावू आम्ही स्मित रे

स्पष्टपणे देणार नाही कधीही नकार रे
काम मात्र करणार नाही आम्हीच ते हुश्शार रे

खोटे नाटे बोलायाला नाही आम्ही भीत रे
मनामध्ये द्वेष आणि ओठांवरती प्रीत रे

जनरीत म्हणती याला कोणी व्यवहार रे
सभ्यतेच्या बुरख्याखाली भरला की विखार रे

खोटी खोटी यारी आणि खोटा खोटा प्यार रे
पाठीमध्ये खंजीराचा करू आम्ही वार रे

गोड बोलून खोड मोडू किती आम्ही शूर रे
हीच आमची दुनियादारी बघा आम्ही थोर रे!

Friday, November 15, 2013

गुपित

जगा तुम्ही अन अम्हा जगू द्या असाच अमुचा बाणा रे
उगाच वेड्या संघर्षाच्या धनुष्यास ना ताणा रे

जगू आम्ही ते आनंदाने तुम्हीसुद्धा मस्त रहा
नकळत होउनी जाईल सारा संघर्षाचा अस्त पहा

धुऊन टाकू किल्मिष सारे अन्तर्मनही स्वच्छ करू
आणिक सारे आनंदाने पुन्हा एकदा फेर धरू

कविता वाचुनी इतरा वाटे दोन जनातील झगडा हा
सत्य असे ना खचित परी हे गुपित सांगतो तुम्हा पहा

माझ्या मनिच्या दोन तटातील वणव्याची ही आग असे
व्यक्त करुन ते तुम्हा सांगणे आज मला हे भाग असे

Thursday, November 14, 2013

भेटीलागी जगा

भेटीलागी जगा लागलीसे आस।
वाटे रात्रंदिवस मुक्त व्हावे।।

आत्मबंध सारे तोडोनी टाकावे।
उन्मुक्त जगावे सरळ आणिक।।

वाटे मनोगत सांगुनी टाकावे।
परंतु भेटेना कोणी आप्त।।

कितीतरी वेळा चुकल्या त्या गाठी।
राहिलो शेवटी एकटाची।।

सरते शेवटी केला हा प्रयत्न।
लिहूनिया ब्लॉग व्यक्त झालो।।